मुंबई : "मध्य रेल्वेच्या कॅटरिंग विभागात घोटाळा झालाच नाही," असा दावा मुख्य व्यवसायिक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी केला आहे. आरटीआय अंतर्गत मध्य रेल्वेतील कथित घोटाळा समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हे उत्तर दिलं आहे.


आरटीआयमधून बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आकडेवारीत चुका केल्या. त्यामुळे कॅटरिंग विभागात घोटाळासदृश्य माहिती समोर आली, असं शैलेंद्र कुमार म्हणाले.

मध्य रेल्वेचं कॅटरिंग विभाग तोट्यात चालत असल्याचं समजल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती मागवली होती. त्यावरुन कॅटरिंग विभागात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. मध्ये रेल्वेसाठी खरेदी केलेल्या सामुग्री किरकोळ किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याची समोर आलं होतं.

रेल्वे कॅटरिंग घोटाळा : 100 ग्रा. दही 972 रु, 1 लि. शुद्ध तेल 1241 रु!

आरटीआयमधून समोर आलेली माहिती

अजय बोस यांना मिळालेल्या आकडेवाडीनुसार, "कॅटरिंग विभागाने 100 ग्राम दह्यासाठी 972 रुपये मोजले, बाजारात याची किंमत केवळ 25 रुपये आहे. इतकंच नाही तर रेल्वेने बऱ्याच वस्तू त्यांच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचं समोर आलं.

याशिवाय मार्च 2016 मध्ये 58 लिटर शुद्ध तेल 72 हजार 034 रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. म्हणजेच एक लिटर शुद्ध तेल 1241 रुपयांत खरेदी करण्यात आलं. तसंच टाटा मीठाच्या 150 पाकिटांना 2670 रुपये मोजण्यात आले. एका पाकिटाची मूळ किंमत 15 रुपये आहे, परंतु रेल्वेने 49 रुपयांत एक पाकिट खरेदी केलं. तर पाण्याची बॉटल आणि सॉफ्ट ड्रिंकच्या एका बॉटल साठी रेल्वेने 59 रुपये दिले."

रेल्वे प्रशासनाचा दावा

परंतु ही माहिती चुकीचं असल्याचं सांगत रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे की, "ही माहिती जून 2016 मधली आहे. दह्याचे किलोऐवजी कार्टनचे दर दिले आहेत. एका कार्टनमध्ये 108 कप असतात. मात्र, आरटीआयमध्ये दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे दह्याच्या एका कपची किंमत ही 972 रुपये आहे."

"तर तेलाच्या किंमतीची माहिती देताना लिटरऐवजी टीनच्या दराची माहिती देण्यात आली. एका टीनमध्ये 15 लिटर तेल असतं. त्यामुळे एका लिटर तेलाची किंमत 1241 रुपये दिली आहे."

दरम्यान या प्रकरणात उत्तर देणाऱ्या तीन आरटीआयच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.