पालघर : परदेशातून आलेल्या गुजरात राज्यातील चार प्रवाशांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का असल्याने रेवले मधील सहप्रवासी व तिकीट तपासणीस यांनी त्यांना पालघर रेल्वे स्थानकात गाडी थांबून उतरण्यास भाग पाडले. या चारही प्रवाशांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नसल्याने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या आग्रहापोटी खाजगी वाहनातून त्यांच्या मूळ गावी जाण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली.
12216 डाऊन गरिबरथ या गाडीमध्ये जी-4 आणि जी-5 या दोन डब्यांमध्ये चार प्रवाशांच्या हातावर अलगीकरण करण्याचे शिक्के असल्याचे सहप्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी ही बाब तिकीट तपासनीसच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रवाशांच्या सहवासामुळे आपले आरोग्य धोक्यात येईल हे लक्षात घेता तिकीट तपासनीस यांच्याकडे आक्षेप नोंदवला. नंतर तिकीट तपासणीसांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात थांबविण्याच्या सूचना दिल्या.

पालघर रेल्वे स्थानकात दिल्लीकडे जाणारी गाडी थांबत असून त्याच्यामध्ये करोनाबाधित रुग्ण असल्याची उद्घोषणा फलाटावर करण्यात आल्याने उपस्थित प्रवासी व इतर नागरिकांची एकच धावपळ सुरु झाली. लगेचच फलाट रिकामी करण्यात आला. दोन वाजण्याच्या सुमारास ही गाडी पालघर रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर या चार प्रवाशांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले. पालघरच्या आरोग्य पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त तपासल्यानंतर या चारही प्रवाशांना कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळत नसल्याचे दिसून आले.

प्रथम या रुग्णांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्याची तयारी करण्यात आली होती. नंतर त्यांना बोईसर येथील टिमा रुग्णालयात निर्माण केलेल्या स्वतंत्र अलगीकरण कक्षात ठेवण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रवासी पालघर येथे वास्तव्य करण्यास तयार नसल्याने जर्मनीहून आलेल्या या प्रवाशांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा आग्रह धरल्याने राज्य करोना कक्षाशी संपर्क साधून, त्यांच्याकडून मार्गदर्शन सूचना प्राप्त केल्यानंतर खाजगी वाहनातून त्यांना सूरतच्या दिशेने पाठवण्यात आल्याची माहिती पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

या चार प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनाने गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाला कळवली असून या चारही रुग्णांचा पाठपुरावा पालघर करोना दक्षता कक्षातून देखील करण्यात येईल असे सांगण्यात आले

दरम्यान कोरोना व्हायरसने जगभर अक्षरश: थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास 8 हजार लोकांचा या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 147 वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या ज्या वुहान शहरातून या कोरोनाची व्हायरसरची सुरुवात झाली होती, तेथील परिस्थिती आता जवळपास नियंत्रणात आली आहे. तर राज्यात रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

coronavirus | गर्दी टाळा... पण लोक ऐकत का नाहीत?



राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती

  • पुणे - 8

  • पिंपरी-चिंचवड - 10

  • मुंबई - 7

  • नागपूर - 4

  • यवतमाळ - 3

  • कल्याण - 3

  • नवी मुंबई - 3

  • रायगड - 1

  • ठाणे - 1

  • अहमदनगर - 1

  • औरंगाबाद - 1