वसई विरार :  वसई विरार क्षेञात मिनी धारावी म्हणून ओळख असलेल्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव होवू लागला आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोषभूवन, बिलालपाडा, धानीवबाग, श्रीराम नगर, तर विरारच्या चंदनसार, गोपचर पाडा, कोपरी ह्या परिसरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जर या झोपडपट्टीतील कोरोनाचा फैलाव थांबला नाही तर येथे कम्युटी स्प्रेटचा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नालासोपारा पूर्वेकडील संतोषभूवन, बिलालपाडा, धानीवबाग, श्रीराम नगर या परिसरात पाच लाखांच्याहून अधिक लोकवस्ती बैठ्या चाळीत वसलेली आहे. सार्वजनिक बाथरूम,  सार्वजनिक ठिकाणावरील पाणी, दोन ते तीन फुटाच्या अंतरावरील घर यातून एकमेकांचा संपर्क वाढत आहे. तसेच चाळीत ग्रुपने पत्ते खेळणे,  दारु पिण्यास बसणे, सार्वजनिक शौचालय वापरने यामुळे एकट्या श्रीराम नगर येथील येथील बैठ्या चाळीत कोरोनाचा शिरकाव होऊन 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर विरारच्या गोपचर पाडा, कोपरी, चंदनसार येथील चाळ वस्तीत कोरोनाचे 33 रुग्ण आढळले आहेत. पण महापालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या भागात कोणतेही निर्जंतुकीकरण होत नाही, दवाखान्याची या परिसरात कोणतीही सुविधा नाही. तात्काळ रुग्णवाहिका मिळत नाही. तसेच घराघरात कोणताही सर्वे झाला नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी आणि नगरसेवकांनी केला आहे. या भागात आतापर्यंत 3 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे.

वसई विरार नालासोपारा क्षेत्रात आतापर्यंत 1385 एवढी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. यात 49  जणांचा मृत्यू झाला आहे. 788 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित 607 जणांवर उपचार सुरू आहेत. 1385 रुग्णापैकी एकटया नालासोपारा पूर्वेकडे 529 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर नालासोपारात सर्वाधिक 25 मृत्यू देखील झाले आहेत.

अनलॉक सुरू झाल्यानंतर चाळीतील लोकं मोठ्या प्रमाणात घराबाहेर  पडले आहेत. एकमेकांच्या संपर्कातून  बैठ्या चाळीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला ही लक्षण वाढली आहेत. या लक्षणातून मागच्या आठवडाभरात 100 च्या वर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढला असून, पालिकेने अशा परिसरात जास्त लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांच म्हणणं आहे. तर स्थानिक आमदारांनीही पालिकेने कोरोनावर स्थानिक समित्या बनवून, नागरिकांचा सहयोग घेवून, पालिकेने उपाययोजना आखण्याच मत व्यक्त केलं आहे.

सध्या पावसाळा तोंडावर आहे. त्यात पावसाळ्यात या भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचतं. आणि या पाण्याचा निचरा देखील लवकर होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव आणखीन होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.