मुंबई : एकीकडे धारावीतील रुग्णसंख्या दर दिवसाला वाढत आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरांत 'प्रतिधारावी' अशी ओळख असणाऱ्या दहिसरच्या गणपत पाटील नगर झोपडपट्टीत कोरोनाचे केवळ दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या झोपडपट्ट्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्या तरी दहिसरमधलं प्रतिधारावी असलेलं गणपत पाटील नगर हे याला अपवाद आहे.




  • दहिसरमध्ये प्रतिधारावी म्हणून गणपत पाटील नगर झोपडपट्टी ओळखली जाते.

  • या झोपडपट्टीत सुमारे 40 ते 50 हजार एवढी लोकसंख्या आहे.

  • आतापर्यंत गणपत पाटील नगरमध्ये 10 हजार लोकांच्या स्क्रीनिंग झाल्या आहेत.

  • 40 ते 50 वर्ष वयावरील नागरिकांची ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे.

  • यापैकी, केवळ 15 लोकांमध्येच कोरोनाची लक्षणे आढळली मात्र, लक्षणे असतांनाही हे लोक निगेटिव्ह होते.

  • याठिकाणी आतापर्यंत केवळ दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

  • आर नॉर्थ या वॉर्डमधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या सर्वात कमी म्हणजे 50 इतकी आहे.

  • दहिसर गांव, केतकीपाडा, गणपत पाटील नगर अशा परिसराचा मिळून बनलेल्या आर नॉर्थ वॉर्डने कोरोनाची रुग्णसंख्या वाढ रोखण्यात बरंचसं यश मिळवलेलं दिसत आहे.


गणपत पाटील नगरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी शिबीर राबवून लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्यात आला. यामध्ये आरोग्य सेविकांनी तापाचे रुग्ण शोधून काढले आहेत. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येतं आहे. दुसरी टीम आता थर्मल गनद्वारे तपासणी करुन स्क्रीनिंग करण्याचं काम करत आहे. केवळ झोपडपट्टीच नाही तर इमारतीच्या परिसरांमध्येही याच प्रकारे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. सोबतच, वैद्यकीय आरोग्य शिबीर राबवून रुग्णांचा शोध स्वत:च घेतानाच सर्व झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये दररोज जंतूनाशक फवारणी केली जात आहे.


त्यामुळे एकीकडे धारावीतले आकडे धडकी भरवणारे असले तरी प्रतिधारावी असलेल्या गणपत पाटील नगरची स्थिती मात्र सध्या तरी समाधानकारकच म्हणायला हवी.