मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्याने शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी आणि इयत्ता नववी व इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांचा निकाल एसएमएस, दूरध्वनी व इतर ऑनलाइन पद्धतीने तात्काळ कळवावा. जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये संभ्रम राहणार नाही, अशा सूचनाच पत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना उपलब्ध साहित्याच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करता येणे शक्य होईल त्या दृष्टीकोनातून हा निकाल तात्काळ ऑनलाइन कळवून पुढील इयत्तेत त्यांना बढती देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे, स्थानिक लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्याची आवश्यक कार्यवाही शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने करायची आहे. मात्र, यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांची माहिती सर्व शाळांमध्ये असताना घरी बसून शिक्षकांनी निकालाची कार्यवाही कशी करायची? शिवाय संचारबंदीच्या काळात शाळांत पोहचायचे तरी कसे असे अनेक प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहेत.
CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील
शिक्षकांच्या अडचणींमध्ये वाढ
अनेक शिक्षकांचे 10 वी बोर्डाचे पेपर देखील शाळेतच आहेत ते तपासून नियमकांकडे कसे पाठवावे याबाबतचा निर्णय अजूनही राज्य मंडळाने घेतलेला नसल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा व शिक्षकांपुढील अडचणी पाहता निकालपत्र पालकांना देण्याची घाई करू नये, अशी प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी दिली. यामध्ये शिक्षकांना उन्हाळी सुट्टी आहे की नाही? याबाबत अजून कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेत तपासणीकरिता पडून आहेत, त्याबाबत लॉकडाऊन नंतर निर्णय व आता रिझल्ट बनवायचा कसा व कोठून? अनेक शाळांमध्ये ऑनलाईन सुविधा नाहीत, त्याआधी शासनाकडून पुरविण्यात याव्यात. आदेश वस्तुस्थिती साक्षेप नसल्याने याबाबत योग्य ते सहकार्य मिळणे कठीण आहे, असं मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांचं म्हणणं आहे.