कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. पण तरीही नागरिक मात्र आपल्याच धुंदीत वावरताना दिसत आहेत. याला आळा घालण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) आता कठोर नियम लावायला सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीत आत्तापर्यंत कल्याण डोंबिवलीत तब्बल 137 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांत रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढतोय. या आकड्यानं आता शंभरी पार केली असून यामुळे झोप उडालेल्या केडीएमसी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला. यापुढे किराणा घेण्यासाठी सुद्धा देखील कल्याण-डोंबिवलीच्या रहिवाशांना घराबाहेर पडता येणार नाही.
कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेनं काऊंटर सेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ कोणत्याही दुकानावर वस्तूंची विक्री होणार नाही. जे मालाची घरपोच डिलिव्हरी करतील त्या दुकानदारांनाच विक्री करता येईल. दुकानावर गर्दी दिसल्यास गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. तसेच भाजी आणि फळ विक्रेत्यांना देखील एकाच ठिकाणी बसण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. मात्र औषधांची दुकानं, घरगुती गॅस आणि लिफ्ट दुरुस्ती अशा मोजक्यात सेवांना या निर्बंधातून वगळ्यात आलं आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांचा आकडा पाहिल्यानंतर असे कठोर निर्बंध का गरजेचे आहेत हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. डोंबिवली पूर्व - 48, डोंबिवली पश्चिम - 35, कल्याण पूर्व - 28, कल्याण पश्चिम - 16, टिटवाळा - 5, मोहोने - 5 रुग्ण आढळून आले आहेत. आता हा आकडा आणखी वाढू द्यायचा नसेल तर कल्याण डोंबिवलीकरांना सर्व नियमांचं पालन करुन घरात बसावं लागेल. अन्यथा तुमच्या दारापर्यंत आलेला कोरोना उंबरठा ओलांडून घरात कधी येईल, हे सांगता येणार नाही.
कल्याण डोंबिवलीनंतर बदलापूर कोरोना हब
कल्याण-डोंबिवलीनंतर बदलापूर हे कोरोनाचं नवीन हब बनलं आहे. कारण बदलापुरात आत्तापर्यंत कोरोनाचे 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज बदलापुरात पुन्हा एकदा तीन नवे रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये दोघे मुंबई महापालिकेत काम करणारे असून एक जण खासगी कंपनीत नोकरीला आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे मुंबईला अत्यावश्यक सेवेत नोकरी करणारे आहेत. बदलापुरातून दररोज दोन ते अडीच हजार लोक मुंबईला अत्यावश्यक सेवेच्या नोकरीसाठी जातात. अशा परिस्थितीत आता या कर्मचाऱ्यांची संबंधित शासकीय यंत्रणांनी मुंबईतच तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी भूमिका तहसीलदार जयराज देशमुख यांनी घेतली आहे. बदलापुरातील 20 रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून तिघांना डिस्चार्ज मिळालाय, तर 16 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र शहरात बाहेरून येणारा कोरोना रोखण्यासाठी आता मुंबईला जाणाऱ्यांना तिकडेच थांबवण्याची मागणी केली जात आहे.
संबंधित बातम्या
- PM Modi | 3 मे चा दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? पंतप्रधानांकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना
- PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
- कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, नफेखोरी करणाऱ्या कंपनीला कोर्टानं फटकारलं
Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती