मुंबई : मुंबईतली कोरोनाग्रस्तांची रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, त्याच मुंबईसाठी एक दिलासादायक बातमीसुद्धा आहे. कारण मुंबईतल्या कोरोनाच्या कन्टेंटमेंट झोनची संख्या आता घटली आहे.
खरंतर, अर्ध्याहून अधिक मुंबई कोरोनाच्या विळख्यात आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरोनाचे पेशंट आहेत. मात्र, मुंबईतलेच काही रहिवासी भाग असेही आहेत की जिथे आधी कोरोनाचे रुग्ण सापडल्याने महापालिकेने ते कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले होते. मात्र असे 231 कन्टेंटमेंट झोन डिकन्टेंट झाले आहेत.
मुंबईतील कन्टेंटमेंट झोनची संख्या 1026 पर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यापैकी 231 कन्टेंटमेंट झोनमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा रुग्ण नाही. त्यामुळे 231 कन्टेंटमेंट झोन डिकन्टेंट झाले आहेत, म्हणजेच त्यांना कन्टेंटमेंट यादीतून वगळलं आहे.
आता मुंबईतील कन्टेंटमेंट झोनची संख्या 805 एवढी झाली आहे. डिकन्टेंट झालेल्या झोनमध्ये मुंबईतील विविध वॉर्डमधील झोनचा समावेश आहे.
कन्टेंटमेंट झोन म्हणजे काय?
- ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे, अशा ठिकाणापासून आणि परिस्थितीनुरुप ठराविक परिघातील क्षेत्र हे बाधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येतं.
- हे क्षेत्र 'कन्टेंटमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात येत आहे. 'कन्टेंटमेंट झोन' लगतच्या परिसरात परिस्थितीनुरुप गरजेचे वाटल्यास उर्वरित क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करुन त्यावर देखरेख ठेवली जाते.
- 'कन्टेंटमेंट झोन' मधील लोकांसाठी पडताळणी आणि तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.
- 'कन्टेंटमेंट झोन' परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तू सशुल्क पद्धतीने देण्याचे व्यवस्थापन करण्यात येते. यासाठी गॅस एजन्सी, दूध पुरवठादार, अन्नधान्य-भाजीपाला विक्रेते इत्यादींची मदत घेतली जाते.
सध्या मुंबईतील वेगवेगळ्या विभागांमध्ये असणाऱ्या 231 झोनला कन्टेंटमेंट यादीतून वगळले असले तरी लॉकडाॉऊनचे नियम मात्र त्यांना पाळावेच लागणार आहे. त्यामुळे, तुम्ही कोणत्याही झोनमध्ये असलात तरी काळजी घेणं मात्र गरजेचे आहेच.
दरम्यान, मुंबई हे कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट बनलं आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे 5407 रुग्ण आहेत. यापैकी 204 जणांचा मृत्यू झाला आहे.