मुंबई : जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून देशव्यापी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र राज्यात असून मुंबई शहरातही कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. याचसोबत लॉकडाऊनमुळे देशासह राज्यातील उद्योगधंदेही ठप्प झाल्यामुळे आर्थिक उलाढाली थांबल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्ती केली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत दोन्ही नेत्यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. या बैठकीस महाविकास आघाडीतील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जनतेला संबोधित करताना देशात चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्याआधी पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेत, लॉकडाऊन वाढवण्याआधी केंद्राला राज्याकडून अहवाल देण्याचे आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत दिले होते. आज राज्याला केंद्राकडे अहवाल सादर करायचा आहे. त्याआधी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लॉकडाऊन वाढवताना कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, तसेच काय करावं, काय करू नये, यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.


देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. तर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात लवकरच लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. साधारणतः दोन तासांपर्यंत ही बैठक सुरु होती. सर्व अधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अहवाल दिला. तसेच या बैठकीत आर्थिक बाबींवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. चौथ्या लॉकडाऊनकडे जाताना राज्याच्या तिजोरीवर जास्त भार पडणार नाही, यासाठी काय उपाययोजन केल्या जाऊ शकतात, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, देशभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना खिळ बसली आहे. याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.