मुंबई : मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील 80 टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी ठेवावेत अशी शिफारस टास्क फोर्सने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने मुंबईतील कोरोनाचे वाढते रुग्ण त्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी डॉ.संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे.
मुंबईत सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालय मिळून एकूण 30 हजार बेड आहेत. त्यातील 80 टक्के बेड म्हणजे 22 हजार हे फक्त कोविड रुग्णांसाठी ठेवावे अशी शिफारस आहे. टास्क फोर्समधील काही सदस्यांच्या मते 60 टक्के बेड जरी कोविड रुग्णांसाठी दिले तरी चालेल असं देखील म्हटलंय. त्यामुळे 60 ते 80 टक्के बेड हे कोविड रुग्णांसाठी असावेत. तसेच ह्या बेड मधील 20 टक्के बेड अन्य रुग्णांना देण्याचे अधिकार हे सरकारकडे असावेत अशीही शिफारस केलेली आहे.
सध्या अनेक रुग्ण बेड मिळत नसल्याची तक्रार करतात त्यामुळे राज्य सरकारकडे बेड देण्याचे अधिकार असावेत, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे रुग्णालय ही पूर्ण क्षमतेने चालत नाहीत, अशी माहिती टास्क फोर्सने दिलीय. अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची शिफारस ही टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच आयुर्वेदिक टास्क फोर्स नेमण्याची ही शिफारस मुख्यमंत्र्यांना केली आहे. ही मागणी मान्य झाली आहे.
मुंबईत कोविड 19 रुग्णांसाठी खाटांमध्ये वाढ
मोठ्या रुग्णालयांवरील ताण हलका करण्यासाठी वेगानं सीसीसी 1 आणि सीसीसी 2 व्यवस्थांची उभारणी करण्यात येणार आहे. कोरोना काळजी केंद्र 1 (सीसीसी1) ची क्षमता वाढवून 22 हजार 941 खाटा तयार होणार आहेत. याठिकाणी संशयित रुग्ण व नजिक संपर्कातील व्यक्तींना ठेवले जाते. तसेच, कोरोना काळजी केंद्र 2 (सीसीसी2) व्यवस्थेची क्षमता वाढवून ती 34 हजार 329 इतकी केली आहे. सीसीसी 2 व्यवस्थेत सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण दाखल केले जातात. याठिकाणी अद्ययावत सुवधा उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या रुग्णालयांवरचा ताण हलका होतो.
काही कोरोना काळजी केंद्र 2 (सीसीसी2) मध्ये ऑक्सिजन आणि आयसियु युनिटसची सोय करण्यात आलीय. टी विभागातील मिठानगर शाळेत 10 आयसीयू बेडस् उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, वरळीतील नॅशलन स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी 70 आयसीयू बेडस् उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात 40 मॉड्युलर तर 30 मोबाईल आयसीयु बेडस् आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणच्या एमएमआरडीए मैदान येथे 1हजार खाटांची तर गोरेगांव येथील नेस्को मैदानावर 1240 खाटांची क्षमता असणारी सीसीसी 2 व्यवस्था उभारली जातेय. इथेही ऑक्सिजन आणि मोबाईल आयसीयू युनिट आहेत.