नालासोपारा : मुंबईतील नालासोपाऱ्या रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. नालासोपारा एसटी स्टँड बंद केल्यामुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर आले आणि आम्हाला रेल्वेने प्रवास करू द्या अशी मागणी या संतप्त प्रवाशांनी केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर अनलॉकमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.


नालासोपारा रेल्वे स्थानकातून सध्या संतप्त प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाजूला नालासोपारा एसटी स्टँड आहे. तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी आपला मोर्चा नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे वळवला. स्थानकात प्रवाशांनी रेल्वे रोखून आम्हालाही रेल्वेने प्रवास करून द्यावा अशी मागणी केली. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर हे सर्व प्रवासी ट्रॅकवर उतरले, त्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीने प्रयत्न करून त्यांना बाजूला काढलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा रेल्वेसेवा सुरळीत सुरु झाली आहे.


पाहा व्हिडीओ : एसटी स्टँड बंद; संतप्त प्रवाशांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको



दरम्यान, देशात सुरु असलेल्या मिशिन बिगेन अगेननंतर मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यात आली. परंतु, त्यामधून प्रवास करण्याची परवानगी फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. परंतु, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे.


पाहा व्हिडीओ :  प्रवाशांच्या गोधळानंतर नालासोपाऱ्यातील परिस्थितीचा आढावा



नालासोपाऱ्यातील घटनेबाबत एसटी महामंडळाकडून स्पष्टीकरण


आज सकाळी नालासोपारा बस स्थानकावर अचानक तीन ते चार हजार प्रवाशांनी गर्दी केली. येथून दररोज सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या व इतर कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जातात. (नालासोपारा, वसई विरार या भागातून दररोज सुमारे 300 बसफेऱ्या केल्या जातात.) अचानक गर्दी केलेल्या प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे मुंबईला त्यांच्या खाजगी कार्यालयात कामासाठी जाणारे होते. त्या प्रवाशांनी अत्यावश्यक सेवेसाठी सोडल्या जाणाऱ्या बसमधून आम्हाला देखील प्रवास करण्याची परवानगी द्या. अशी आग्रही मागणी केली. या प्रवाशांना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करित, इथे लगेच बसेस उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे स्थानिक एसटी प्रशासनाने सांगितले. तरीदेखील संतप्त प्रवासी ऐकायला तयार नव्हते. पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील संबंधित प्रवाशांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळता बसस्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक एसटी प्रशासनाने सुरक्षेची बाब म्हणून पोलीसांच्या सुचनेनुसार बसस्थानक तातडीने बंद केले होते, त्यानंतर लगेच सकाळी 10 : 30 वाजता बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.भविष्यात प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जादा बस फेऱ्यां सोडण्यात येत आहेत.