कोरोना व्हायरसने सध्या जगाभरात थैमान घातला आहे. परिणामी हॅण्ड सॅनिटायझर आणि फेस मास्कची मागणी वाढली आहे. परंतु त्याची कमतरता पाहायला मिळते. याचाच फायदा घेत काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जे या गोष्टींचा साठा करुन जास्त किमतीत विकण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंधेरीतून 15 कोटींचे मास्क जप्त केले होते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी एक कोटींचे मास्क मुंबई पोलिसांनी विलेपार्ले हद्दीतून जप्त केले. आज गुन्हे शाखेने अडीच लाखांचे हॅण्ड सॅनिटायझर जप्त करत तिघांना अटक केली आहे. व्रज धारिया (वय 20 वर्ष), जैनम देधिड्या (वय 21 वर्ष) आणि नीरज व्यास (वय 40 वर्ष) अशी या आरोपींची नावं आहेत.
हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांची मागणी पाहता केंद्र सरकारने या दोन्ही गोष्टींचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमतीत त्याची विक्री करता येणार नाही आणि साठेबाजीही करता येणार नाही. मात्र तरीही लालसेपोटी काही लोक काळाबाजार करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांची करडी नजर या काळाबाजर करणाऱ्यांवर आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून 15 कोटींचा मास्कचा साठाही त्यांच्याच नेतृत्त्वात पकडला होता.