मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात कोरोनाच्या व्हायरसचे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण केलेले असतानाच आज मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मंत्रालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अधिकारी कोरोनाच्या टेस्टसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सदर अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट आल्याने हा अधिकारी देखील कस्तुरबा रुग्णालयात पोहोचला आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी नुकतंच अमेरिकेला जाऊन आले आहेत. त्यानंतर त्यांना खोकला आणि ताप झाल्याने कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्यांची कोरोनाचे टेस्ट पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही भाऊ एकाच इमारतीत राहतात, एकमेकांना भेटत राहतात. भावाचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्याने तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले आणि आज कस्तुरबामध्ये या अधिकाऱ्याच्या टेस्ट झाल्या आहेत. या अधिकाऱ्याचे रिपोर्ट्स अजून आलेले नाहीत.

मंत्रालयात नो एन्ट्री

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीपीएमएस) प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक आज गृह विभागाने जारी केले आहे. अतिमहत्त्वाच्या कामांसाठी मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडे येणाऱ्या महत्त्वाच्या 10 व्यक्तींना तर मुख्य सचिव तसेच अन्य विभागीय सचिव यांच्याकडे येणाऱ्या 5 व्यक्तींना प्रतीदिन प्रवेश देण्यात येईल. परंतु, प्रवेश देण्यापूर्वी या व्यक्तींचा विमानतळावर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणीप्रमाणे तपासणी करुनच प्रवेश दिला जाईल. मंत्री, राज्यमंत्री कार्यालय तसेच मुख्य सचिव व विभागीय सचिवांच्या कार्यालयाच्या पत्रानुसार या व्यक्तींना सर्व तपासणीअंती प्रवेश देण्यात येईल.

Coronavirus | सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी तसंच धार्मिक उत्सव बंद करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

क्षेत्रीय कार्यालयातून दैनंदिन कामकाजासाठी येणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाहीत. गृह विभागामार्फत 1 वर्षाच्या कालावधीसाठी  वितरीत करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रवेशपास धारकांपैकी ज्यांचे कार्यालय मंत्रालय इमारतीत आहे अशाच व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. इतर तात्पुरत्या प्रवेशपास धारकांनाही मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. अत्यंत तातडीचे टपाल, संदेश इमेलद्वारे पाठवावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंत्रालय प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.



बायोमेट्रिक हजेरी बंद

‘कोरोना’च्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी मंत्रालयासोबत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठीची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक विभागाने आस्थापना शाखेत हजेरीपट ठेवून त्याद्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
पिंपरी चिंचवड मनपा- 9,
पुणे मनपा- 7,
मुंबई -6, नागपूर-4,
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण-प्रत्येकी 3,
रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद- प्रत्येकी 1 असे एकूण 39 रुग्ण आढळून आले आहेत.