पालघर : पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना रविवारी (5 एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास उंबरगाव किनाऱ्यावर भरती वाढू लागताच बोटी हुसकावून लावण्यासाठी नांगरलेल्या बोटींचे दोरखंड गुजरात पोलीसांनी कापले. तर स्थानिक नागरिकांनी या बोटीवरील खलाशांवर रात्रीच्या अंधारात दगडफेक करून अमानुषपणाचे दर्शन घडविले. त्यामुळे नाईलाजास्तव या खलाशांना उपाशीपोटी खोल समुद्रात जावे लागल्याची माहिती त्यांनी नातेवाईकांना फोनद्वारे दिली, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.


गुजरातच्या विविध बंदरातून घरी परतण्यासाठी हे खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात ,दमण आणि सेलवास येथील खलाशांना बोटीवरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्र राज्यातील खलाशांना उतरण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी मज्जाव केला. त्यानंतर हे खलाशी प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत बसले. मात्र रात्री उशिरापर्यंत दिलासा देणारा निर्णय आला नाही. उलटपक्षी त्यांना माघारी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या. खलाशांना तपासणी करून निवारा केंद्रात ठेवण्याची केलेली विनंती देखील फेटाळण्यात आली.


अरबी समुद्रात अडकलेल्या 1700 खलाशांना अखेर गुजरातमध्ये उतरवलं


बोटीवरून घरी गेलेल्या काही स्थानिक खलाशांनी बोटीवरच्या सहकाऱ्यांकरिता जेवण आणले असताना काही अविवेकी नागरिकांनी दगडफेक सुरू केली. तर अधिकची पोलीस कुमक आणून नांगरलेल्या बोटींचे दोर कापण्यात आले. गुजरात सरकार ने त्यांच्या खाण्या पिण्याची कोणतीच सोय केली नाहीच, शिवाय पोलिसी बळाचा वापर करून बोटींना हुसकावून लावले. याची माहिती खलाशांनी नातेवाईकांना दिली. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने अनेक कुटुंबांनी रात्र जागून काढली. सध्या सुमारे 450 खलाशी आपल्या बोटी घेऊन गुजरात राज्यातील वेरावळकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.


Coronavirus | डाहणूच्या तलसारी भागातील मच्छिमार समुद्रात अडकले