मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देत आहे. मात्र, तरीही रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी होतना दिसत नाही. परिणामी प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कंटेनमेंट झोन' परिसरातील रस्त्यावरील भाजी विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे.

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, भाजीमंडईतील गर्दी अद्यापही कमी होताना दिसत नाही. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी पाहून कोरोनाविरूद्धच्या लढाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी गर्दी होते ज्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता वाढत होती. त्यामुळे भाजी विक्रीवर बंदी घालण्यात आले आहे.

या कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू याच परिसरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन व व्यवस्थापन महापालिकेच्या विभाग कार्यालय द्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. यानुसार आजवर दररोज सकाळी भाजीविक्रेत्यांद्वारे या परिसरात भाजी उपलब्ध करून देण्यात येत असे. मात्र, ही भाजी घेण्यासाठी या परिसरातील अनेक नागरिक एकाच वेळी गर्दी करत असत. याबाबत आवश्यक ते अंतर ठेवण्याची व एकसारखी न येण्याची वारंवार सूचना करून देखील सूचनेचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.

एकाच वेळी अनेक व्यक्ती भाजी खरेदी करण्यासाठी येत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन व वारंवार सूचना देऊन देखील परिसरातील नागरिक काळजी घेत नसल्याची लक्षात घेऊन नाइलाजाने आजपासून सदर परिसरातील भाजी विक्रेत्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 241 कंटेनमेंट झोन आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या परिसरात 'करोना कोविड 19' चे रुग्ण आढळून आले आहेत, अशा परिसरांना 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. या 'कंटेनमेंट झोन' परिसरातील नागरिकांना तिथून बाहेर पडण्यावर व बाहेरील नागरिकांना झोन परिसरात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :


Coronavirus | Kishori Pednekar | धारावी आता लॉकडाऊन झाली पाहिजे : महापौर किशोरी पेडणेकर