मुंबई: सौम्य लक्षणं, लक्षणांची तीव्रता जास्त आणि खूप जास्त तीव्रता तसेच इतर आजार अशा प्रकारे आता हॉस्पिटलची विभागणी केली जाणार आहे. एकमेकांपासून एकमेकांना लागण होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सर्दी, खोकला आणि ताप असल्यास इतर हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, असं आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. यासाठी राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात ही क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे चार प्रकारामध्ये ही फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत त्यामध्ये डॉक्टर्स असतील असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात कोरोना व्हायसरचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.


ज्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोड्या जास्त प्रमाणात कोरोनाची लक्षणं असलेल्यांसाठी दुसरं हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

निवृत्त सैनिक ज्यांनी आरोग्य सेवेशी संबंधित काम केलं आहे, निवृत्त पारिचरिका तसेच प्रशिक्षित मात्र अजून नोकरीवर नसलेल्या सिस्टर, नर्सेस यांनी मदतीसाठी यावं. प्रशिक्षण घेतलेल्या अशा कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी समोर यावं असं ते म्हणाले. यासाठी Covidyoddha@gmail.com यावर संपर्क करा, असं आवाहन त्यांनी केलं.

जगभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा आहे. पीपीई किट नाहीत अशा तक्रार केली जात आहे. सुरक्षाकवच देखील आपण बनवत आहोत. हॅन्ड सॅनिटायझर बनवत आहोत. व्हेंटिलेटर आपण बनवत आहेत. आपण जोरात तयारी करत आहोत. सोयी सुविधा आपण वाढवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, आपल्या यंत्रणेचे आभार मानतो. आपले सर्वच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. या यंत्रणेच्या सोबतीनेच हे युद्ध आपण लढत आहोत. आम्ही डिस्टन्सिंग पाळत आहोत, कॅबिनेट मिटिंग देखील इतिहासात पहिल्यादाच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली. आमच्यात असं अंतर असलं तरी आम्ही मनाने एक आहोत. कोरोना आपल्या मागे लागलाय मात्र आपणही कोरोनाच्या मागे हात धुवून लागलोय. मला आता राज्यात एकही रुग्ण नको आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. हे दिवस नक्की जाणार. दक्षतेने सामना केल्यास आपण यातून लवकर बाहेर पडू, असं देखील ते म्हणाले.

Corona | सर्वधर्मीय गुरुंना गर्दी न होण्याबाबत आवाहन करा, मुख्यमंत्री ठाकरेंची सूचना, पंतप्रधान म्हणाले...

मास्क अत्यंत दक्षतेने वापरा

जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. किंवा स्वच्छ कपडा, रुमाल वापरा. मात्र हे मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हे मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी ते स्पष्ट केलं. वापरलेला मास्क कुठेही फेकू नका. सुरक्षित जागा बघून असे मास्क नष्ट करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली घरी बसून गैरसोय होतेय, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तणावमुक्त कसं राहता येईल याकडे लक्ष द्या. वाहिन्यांना विनंती की पॉझिटिव्ह कार्यक्रम अधिकाधिक दाखवा. तसंच नागरिकांनी घरात बसून व्यायाम करावा. व्यायाम केल्यास मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. हायरिस्क पेशंटनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं असं देखील आवाहन त्यांनी केलं.

हे युद्ध संपल्याननंतर अर्थव्यवस्थेसोबत युद्ध लढायचं आहे. बाहेरच्या देशात स्थिती गंभीर आहे मात्र जिथून या रोगाची सुरुवात झाली त्या चिनमधीन वुहानमध्ये सर्वच निर्बंध हटवले आहेत. ही बाब दिलासादायक आहे, असं त्यांनी सांगितलं.

साडेपाच लाख बेघर लोकांना दिवसातून तीन वेळेस जेवणाची सोय आपण केली आहे. माणुसकीच्या नात्यातून बेघरांची सोय केली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केशरी शिधापत्रिका धारक मध्यमवर्गीय आहे त्यांच्यासाठी ३ किलो गहू 8 रुपये किलो दराने व २ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. मी पंतप्रधानांना यासंदर्भात किमान आधारभूत किंमतीत धान्य यासाठी मिळावे अशी विनंतीही केली आहे.  केंद्राने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटपही सुरु झाले आहे. केंद्राचे चांगले सहकार्य मिळते आहे, असंही त्यांनी सांगितलं.