ठाणे : एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुठवडा जाणवत असून ठाणेकर नागरिकांना लस मिळले मुश्कील झाले असताना दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने लस घेतल्याचे उघड झाले आहे. ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली असून या अभिनेत्रीची कोविड सेंटरची फ्रंट लाईन वर्कर म्हणून खोटे ओळखपत्र बनवण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या सेलिब्रिटीला ही लस कोणी दिली आणि कशी दिली? या संशोधनाचा विषय असला तरी नियमबाह्य लस दिल्याने पालिका प्रशासन चांगलेच गोत्यात येणार आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच जेष्ठ नागरिक आणि तरुणांना लसीपासून मुकावे लागत असताना काही ठिकाणी लसीकरणासाठी वेंटिंग करावे लागत आहे, मात्र मीरा चोप्रा या सेलिब्रिटीला थेट लस कशी देण्यात आली ? असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. तसेच चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र  बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे.


दरम्यान नियमबाह्य लस घेतल्यानंतर ही मीरा चोप्रा यांनी मोठ्या आवडीने लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत..तसेच या फोटो बरोबर बनवण्यात आलेले खोटे ओळखपत्र देखील पोस्ट करण्यात आले असून विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच नियमबाह्य लस देण्यात येणाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 


आमदार निरंजन डावखरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ठाणे महापालिकेने कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्यकेअर कंपनीने चक्क तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मीरा चोप्राला कामावर ठेवलंय. मीराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय? कि लस घेण्यापूरते आयकार्ड दिले गेले? असा सवाल त्यांनी केला आहे. 






सेलिब्रेटीला लस दिल्याबाबत माहिती घेऊ. तसेच संबंधित संस्थेकडून तिला ओळखपत्र कसे देण्यात आले, याचीही माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल,असं ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटलं आहे.