मुंबई : कोविडच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देशात कोरोनाला रोखण्यासाठी रोल मॉडेल ठरलेली आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आता पुन्हा एकदा संकटाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या 15 दिवसांत धारावीत नव्या 860 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी धारावीत आता लसीकरणाचा मेगाप्लान तयार केला जातोय.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी धारावीत मिशन वॅक्सिनेशन सुरु करण्यात आलं आहे. 18 वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण करण्याबाबत तयार केलेला अॅक्शन प्लान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आला आहे.  खासदार राहुल शेवळेंकडून धारावीतील 18 वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. 


धारावीत 80 टक्के लोकसंख्या ही 18 वर्षांच्या वरील वयोगटातली आहे. बाहेर फिरणारा आणि अधिक कोरोना संसर्ग पसरवणारा वर्गही याच वयोगटातील आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचेच लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे धारावीतील दाटीवाटीची वस्ती आणि इतर अडचणी पाहता स्पेशल केस म्हणून  सरसकट लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदर राहुल शेवाळे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.


आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पहिल्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्ण सापडले होते. दुसऱ्या लाटेत त्याहीपेक्षा अधिक रुग्ण  सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वेगवान लसीकरण होणे गरजेचे आहे. तसेच 18 वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरण केले तर कोरोना विषाणूवर मात करणे कितपत शक्य होते. विषाणूचा प्रभाव कमी करता येतो का? याचा अभ्यास करणेही धारावी मॉडेलद्वारे शक्य होईल. पहिल्याप्रमाणेच धारावी हे लसrकरणाचे एक रोल मॉडेल म्हणून जगासमोर ठेवता येईल.


सध्या धारावीत दररोज 1000 लोकांचं लसीकरण केलं जातंय. ती क्षमता 5000 लोकांपर्यंत वाढवली जाईल आणि धारावीत लवकरात लवकर 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून आतापर्यंत धारावीत 5774 जणांना कोरोनाची लागण झाली. यांपैकी 1689 रुग्ण केवळ गेल्या दीड महिन्यातले आहेत. मार्च महिन्यात  829 रुग्ण धारावीत सापडले. तर एप्रिल महिन्यांतल्या गेल्या 15 दिवसांत 860 रुग्ण सापडलेत. धारावीत आतापर्यंत कोरोनाने 319 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीचा पुन्हा हॉटस्पॉट होऊ नये यासाठी लसीकरण गरजेचं आहे. लसीकरणाच्या परिणामांसाठी संशोधनास धारावीचा नवा पॅटर्न सहाय्यक ठरु शकतो.