कल्याण : राज्य शासनाने आदेश देऊनही परराज्यातून येणारे नागरिक कोणत्याही कोविड चाचणीविना कल्याण स्टेशनवर दाखल होत असल्याचे धक्कादायक चित्र एबीपी माझाने समोर आणले होते. यामुळे कल्याण डोंबिवलीत आटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण स्टेशनवर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कोरोना टेस्ट बंधनकारक करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा करण्यात आला.


परराज्यातून महाराष्ट्रात परत येणाऱ्या नागरिकांनी 48 तास अगोदरचा आरटीपीसीआर किंवा अँटीजन टेस्ट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. रस्तेमार्गाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या नागरिकांबाबत या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत असताना रेल्वेने येणारे नागरिक मात्र कोणत्याही टेस्टविना दाखल होत आहेत. मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक असणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकातील परिस्थितीही काही वेगळी नाही. मात्र अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाचा फटका राज्यात आणि कल्याण डोंबिवलीत आटोक्यात येऊ लागलेल्या कोविड परिस्थितीला बसू शकतो. 


परप्रांतीयांचा आरटीपीसीआर चाचणीला ठेंगा; केडीएमसीकडून अँटिजेन टेस्ट


कल्याण डोंबिवलीतही गेल्या महिन्यात अडीच हजारांच्या घरात गेलेली कोरोनाची आकडेवारी आज 200 पर्यंत खाली आली आहे. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनद्वारे शहरात दाखल होणारे बहुतांश नागरिक हे कोणत्याही चाचण्या न करताच येत आहेत. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अधिकारी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा केला. 


यावेळी आयुक्तांनी कल्याण डोंबिवलीचे आकडे 200 पर्यंत आलेले असून इथली कोरोनाची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र कल्याण स्टेशनवर उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालवरून येणाऱ्या नागरिकांमुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजन टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला असून कोरोना टेस्ट न करता आलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा विचारही करत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.