मुंबई: कोरोना काळात (Corona Pandemic) आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन जनजागृती करण्याबरोबरच कोरोनाबाधितांना शोधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्यसेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज मुंबईत 4 हजार आरोग्यसेविका एक दिवसीय संपावर जाणार आहेत. कोरोना काळात घरोघरी जाऊन रुग्ण सेवा करून देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब सरकारला लक्षात आणून देण्यासाठी हा संप करत असल्याची माहिती महापालिका आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.


वारंवार विनंती करूनही त्यांच्या मागण्यांकडे मुंबई महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी पालिकेच्या सर्व चार हजार आरोग्य सेविकांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाचा आरोग्यव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


आरोग्यसेविकांच्या काय आहेत मागण्या?
न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 215 पासून किमान वेतन द्यावे
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रोव्हिडंट फंड पेन्शन देण्यात यावी
ज्या आरोग्य सेविकांना 65 वर्षांनंतर निवृत्त केले आहे. त्यांना पाच हजार रुपये पेन्शन व उपदान त्वरित देण्यात यावे
 प्रसूती रजा व इतर रजा देण्यात याव्यात. 
दररोज 300 रुपये कोविड भत्ता देण्यात यावा
 पाच लाखांचा गट विमा योजना लागू करावी
2016 मध्ये भरती झालेल्यांना 2016 ते 2020 या कालावधीची भाऊबीज भेटची थकबाकी द्यावी
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व सीएचव्हींना 2000 सालापासून 600 रुपये देण्यात यावे


या प्रमुख मागण्यांसाठी आरोग्यसेविका संपावर जाणार आहेत.   वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या मागण्यांसाठी सुरुवातीला एक दिवसाचे आंदोलन करण्यात येणार आहे, परंतु प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पुढे वॉर्ड प्रतिनिधींची समिती बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी दिला आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha