मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातील अनेक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता गोपाळकाला म्हणजेच दहिहंडी उत्सव देखील साजरा करणार नसल्याचं दहिहंडी समन्वय समितीनं जाहिर केलं आहे. दहिहंडी उत्सव यंदा होणार नाही व तो साजरा केला जाऊ नये असे आवाहन दहिहंडी समन्वय समितीने सर्व मंडाळांना केले आहे.


दहिहंडी समन्वय समितीच्या बैठकीत एकमुखानं हा निर्णय घेण्यात आला, 'सर सलामत, तो पगडी पचासचा' नारा देत दहिहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचं समितीनं जाहिर केलं. 2020 हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे. गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहे. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि अबालवृध्दांचा, आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. 2020 च्या या कोरोना संकटाने, या महामारीने मात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.

कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्य सुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यू आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे?, असं समितिनं म्हटलं आहे.


या सर्व गोष्टींचा विचार करुन समितीने यावर्षी श्रीकृष्णजन्माष्टमी सण हा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करायचा निर्णय घेतला आहे. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल, असं देखील समितीने म्हटलं आहे.

मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुसऱ्या दिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे समितीचे मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, असं दहिहंडी समन्वय समितीने म्हटलं आहे.

"सर सलामत तो पगडी पचास" किंवा बचेंगे तो और भी लडेंगे या म्हणींचा आधार घेत हा सण, उत्सव पुढीलवर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करु असेही समितीने म्हटलं आहे.