सागर:  कोरोनाबाधित आरोपींची पोलिसांनी धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या शास्त्रीनगर भागात टोळक्याने तलवारी घेऊन धुडगूस घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणात अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. या आरोपींची पोलिसांनी बुधवारी शास्त्रीनगर आणि हाऊसिंग बोर्ड परिसरात उठाबशा काढायला लावत धिंड काढली.

मात्र गुरुवारी त्याच आरोपींची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यावेळी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. या प्रकारामुळे आता अनेक पोलीस आणि स्थानिकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त होतेय. पोलिसांनी केलेल्या या आत्मघातकी प्रकारावर शहरातून प्रचंड टीका होत आहे. गुन्हेगारीला लगाम घालणं गरजेचं असलं, तरी आरोपींची कोरोना चाचणी केलेली असताना अहवाल येण्यापूर्वी असं कृत्य करणं शहराला आता घातक ठरण्याची चिन्हं आहेत.


आरोपींना शास्त्रीनगर भागात फिरविण्यात आले तेच आरोपी कोरोनाबाधित आढळल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा दिवसांपूर्वी शास्त्रीनगर परिसरात दोन गटात जबर हाणामारी झाली होती. त्यात काही जणांना गंभीर दुखापत देखील झाली होती.
उल्हासनगरमध्ये कोरोना संशयिताच्या मृतदेहाला नातेवाईकांकडून अंघोळ, 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण

उल्हासनगरच्या खन्ना कंपाउंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 9 मे रोजी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णलयात मृत्यू झाला. मात्र त्याला कोरोनासदृश्य लक्षणं असल्यानं डॉक्टरांनी त्याचा मृतदेह नातेवाईकांना द्यायला नकार दिला. त्यावर नातेवाईकांनी कुठलाही नियम न मोडता अंत्यसंस्कार करण्याची लेखी हमी दिली. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. मात्र संबंधित रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा ठोस अहवाल नसल्यानं नातेवाईकांनी रुग्णालयाने प्लास्टिकमध्ये बांधून दिलेला मृतदेह उघडला आणि त्याला अंघोळ घातली. यावेळी अनेकांचे हात मृतदेहाला लागले. इतकंच नव्हे, तर त्याच्या अंत्यसंस्कारालाही जवळपास 70 जण उपस्थित राहिले. हा प्रकार समजताच उल्हासनगर महापालिकेनं या सर्व 70 जणांना शोधून क्वारंटाईन केलं आणि त्यांची कोरोना चाचणी केली. यात यापैकी 9 जण पॉझिटिव्ह आले असून आणखीही काही जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या सगळ्यानंतर उल्हासनगर महापालिकेनं या नातेवाईकांविरोधात कडक भूमिका घेतली असून  त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.