मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला.

भरत गोगावले-रामदास कदम यांच्यात वाद


रायगडमधील आमदार भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात वाद झाला.

“आगामी निवडणुकीत मंत्र्यांची भूमिका काय असणार?, असा प्रश्न आमदार भरत गोगावलेंनी विचारला. शिवाय, "मंत्र्यांनी आमच्याबरोबर व्यवस्थित बोलावं. आम्हाला मंत्री व्हायचं नाही.”, असेही गोगावले म्हणाले. यावर रामदास कदम हे गोगावलेंना उद्देशून म्हटले, “सर्व मंत्र्यांना एका पिंजऱ्यात उभं करु नका. सरळ मंत्र्यांचं नाव घ्या.” त्याचसोबत, “मी आत्ताच्या आत्ता ‘मातोश्री’वर राजीनामा द्यायला तयार आहे, असेही कदम म्हणाले.

भरत गोगावले आणि रामदास कदम काय म्हणाले?

 निलम गोऱ्हे-श्रीरंग बारणेंमध्येही खडाजंगी

शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात खडाजंगी झाली.

निलम गोऱ्हेंच्या वाढदिवसाला लक्ष्मण जगताप हे त्यांना भेटले होते. यावेळी निलम गोऱ्हेंनी जगताप यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या गोष्टीवरुन खासदार श्रीरंग बारणेंनी गोऱ्हेंना उद्देशून म्हणाले, “असे निर्णय घेण्याचे अधिकार निलम गोऱ्हेंना कोणी दिले. आम्हाला शिवसेना शिकवू नये. आम्ही निवडणुका लढलो आहे.”

निलम गोऱ्हे आणि श्रीरंग बारणे काय म्हणाले?

विशेष म्हणजे खासदार श्रीरंग बारणे बोलल्यानंतर निलम गोऱ्हे यांना रडू कोसळलं.

एकंदरीतच ‘मातोश्री’वरील बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.