मुंबई : शिवसेना आमदारांची विकासकामं होत नसल्यानं सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेवटचं अल्टीमेटम देणार आहेत. मातोश्रीवर शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार आणि मंत्र्यांची बैठक झाल्यानंतर नाराजीचा सूर उमटला.


दसरा- दिवाळीआधीच राजकीय फटाके?

शिवसेनेची मंत्री आणि आमदारांनी विकास कामं होत नसल्याची तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली. शिवसेनेच्या मंत्र्यांनाच अधिकार नसल्यामुळे कामं होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जर विकासकामं होत नसतील तर निर्णय घ्यायची वेळ आली आहे, तुमची मानसिकता आहे का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी आमदारांना केल्याची माहिती आहे. यावर 'उद्धव ठाकरेंनी योग्य तो निर्णय घ्यावा आम्ही सोबत आहोत' असं आश्वासन आमदारांनी दिलं.

आम्ही निर्णयाच्या जवळ - संजय राऊत

'शिवसेनेची निर्णायक बैठक मातोश्रीवर पार पडली. सर्व आमदार, खासदार आणि महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. उद्धवजींनी सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं.' असं राऊत यांनी सांगितलं.

'महाराष्ट्रात महागाई वाढली आहे. प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू नये, यासाठी राज्यव्यापी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. सरकारच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यावा, सत्तेत राहायचं की नाही, यावर चर्चा झाल्याची माहितीही राऊत यांनी दिली.

मातोश्रीवर झालेली बैठक अत्यंत खासगीत घेण्यात आली. बैठकीचे तपशील बाहेर पडू नयेत, यासाठी नेते मंडळींच्या मोबाईल-लॅपटॉपवरही बंदी घालण्यात आली होती. इतकंच नाही, तर नेत्यांच्या पीएंनासुद्धा मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आमदार, खासदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंसमोर आपलं रिपोर्ट कार्ड सादर करायचं होतं.