मुलुंड (मुंबई) : मुलुंडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील नवा हंगामा पाहायला मिळाला. मुलुंडच्या वॉर्ड नंबर 108 मधून किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या वॉर्डात किरीट सोमय्यांनी पैसे आणि साडी वाटल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.


यानंतर त्याठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धाव घेत चौकशी केली. मात्र, तपासात काहीच आढळलं नाही.

त्यानंतक पोलिस स्टेशनबाहेर शंभरहून अधिक शिवसैनिक जमले आणि जोरदार घोषणाबाजी सुरु केली. तसेच, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं.

अखेर किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, ऐन रात्रीच्या राड्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, मुलुंड पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्हनमाने यांनी या सर्व प्रकारावर माहिती दिली की, "खासदार किरीट सोमय्या रात्री उशिरा मतदारसंघातील एका परिसरात आले असता विरोधी गटाने त्यांच्या गाडी पार्किंगवर आक्षेप घेतल्यानंतर गाडीची तपासणी केली. यात कसलीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही."