VIDEO | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भाजप प्रवक्त्याकडून थट्टा | एबीपी माझा
मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्वीटला उत्तर देताना वाघ यांनी हे ट्वीट केलं. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्वीटला वाघ यांनी 'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात, असं ट्वीट केलं आहे. ज्यामुळे सध्या चौफेर संताप व्यक्त केला जात आहे.
अवधूत वाघ यांनी याआधीही बेताल वक्तव्यं केली आहेत. मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहेत, असं भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलं होतं. भाजपने वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास बंदी देखील घातली होती.
दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले लावारिस असतात या भाजपच्या प्रवक्त्यांच्या वादग्रस्त ट्वीटवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणणं हा शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे. यावरुन भाजप सरकारला किती मस्ती चढलीय हे दिसून येतंय असे पाटील सांगलीत बोलताना म्हणाले.
तर ज्यांचे आई वडील मरण पावतात त्यांना अनाथ म्हटले जाते. लावारीस म्हणजे बेवारस. आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुलं परिस्थितीमुळे अनाथ झालीत. त्यांना लावारिस म्हणून शेतकऱ्यांना अपमानित केले आहे. यासाठी माफी मागा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.