कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे आदेश नाना पटोले यांनी कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी हे शिवधनुष्य स्थानिक काँग्रेसला पेलवणार का? हा प्रश्नच आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. बुधवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  प्रदेश कार्यालयात कल्याण डोंबिवलीमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात महाआघाडी असली तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात काँग्रेसचे 12 मंत्री कल्याण डोंबिवलीत जनता दरबार घेत शहरातील समस्या नागरिकांकडून जाणून घेणार असल्याची माहिती सचिन पोटे यांनी दिली आहे.
 
राज्यात महाआघाडी सत्तेत असल्यामुळे पालिकेच्या निवडणुका देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र  जागा वाटपात आपल्या वाटेच्या जागा दुसऱ्या पक्षाला जाण्याची भीती असल्याने राज्यात आघाडी असली तरी पालिका निवडणुकीत नको अशीच भूमिका सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून घेतली जात होती. मात्र उघडपणे बोलण्यात कुणी तयार नव्हतं. सध्या महापालिकेत शिवसेनेचे प्राबल्य सर्वाधिक असून शिवसेनेचे 52 नगरसेवक आहेत. जागावाटपात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जागा द्याव्या लागणार असल्याने स्वबळाची शिवसेनेची आग्रही मागणी असली तरी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. 


महाआघाडीचा फायदा होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून महाआघाडीची मागणी होण्याची शक्यता होती. आता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात कसेबसे चार नगरसेवक निवडून आणत अस्तित्व टिकवण्याची धडपड करणाऱ्या कॉंग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवणे पेलवणार आहे का हा प्रश्नच आहे. 


नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यास काँग्रेस देखील आग्रही 


नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी दिली. मात्र या मागणीचा भाजपशी संबंध नसून भूमीपूत्र म्हणून पाठीशी आहोत, असे देखील केणे यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरनावरून स्थानिक भूमिपूत्र आक्रमक झाले आहेत. भाजपने या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यातच आता महाविकास आघाडीमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिल्याने आता शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला असून शिवसेना नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.