मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. निवडणुकीला सव्वा वर्ष बाकी असताना काँग्रेसने मुंबई काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलला असून पक्षातील सर्वांना जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असल्याचे प्रचार समितीचे प्रमुख नसीम खान एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. राज्यातील सरकार किमान समान कार्यक्रम आधारित आहे. भाजप सत्तेत असताना पण भाजप आणि सेना विरोधात लढले होते. त्यामुळे आम्ही वेगळे लढलो तरी सरकारवर परिणाम होणार नसल्याचे नसीम खान यांनी सांगितले.


काँग्रेसमध्ये गट तटाचे राजकारण होणार नाही. सगळ्यांशी संवाद साधू. सरकार बनवत असताना किमान समान कार्यक्रम आखला आहे. मात्र, काही खंत आहे. काँग्रेस जाहीरनाम्यातील गोष्टी राबवल्या जात नाही, म्हणून सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले. भाजप नुसतं राजकारण करत आहे, कोरोना काळात पण त्यांनी राजकारण केलं असल्याची टीका नसीम खान यांनी केली. आम्हाला राजकारण करायचे नाही, मुंबईचा विकास हेच मुंबई काँग्रेसचे ध्येय आहे. मुंबईतील रस्ते, पायाभूत सेवा सुविधा व्यवस्था वाईट अवस्थेत आहे, नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे.


एक वर्षाआधीच काँग्रेसकडून मोर्चेबांधणी


राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारची सगळ्यात मोठी परीक्षा असणार ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक. काँग्रेसने निवडणुकीच्या सव्वा वर्ष आधीच मुंबई काँग्रेसला नवीन नेतृत्व दिले आहे. भाई जगताप मराठा नेते आहेत. त्यांच्यासोबत शीख समाजातील चरणसिंग सप्रा आणि मुस्लिम समाजातील नसीम खान यांना देखील संधी देण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जे इच्छूक होते त्या सगळ्यांना मुंबई संघटनेत संधी देण्यात आली आहे. चंद्रकांत हंडोरे, सुरेश शेट्टी, अमर्जीत सिंह मनहास यांनाही संघटनेत सामावून घेण्यात आले आहे.


शिवसेना हा महापालिकेत सत्ताधारी पक्ष आहे. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे तरी काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. काँग्रेसने मुंबई काँग्रेसच्या नेमणूक करताना जातीय समीकरण पाहिली आहेत. सर्व नेत्यांना संधी दिली. असं असलं तरी माजी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना मात्र डावलण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर संजय निरुपम यांनी सरकार विरोधात घेतलेली भूमिका त्यांना महागात पडल्याचे चित्र आहे. एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेससाठी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.


संबंधित बातमी : 


न्यू-ईयर सेलिब्रेशनवर निर्बंध? मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर होण्याची शक्यता


Bhai Jagtap On BMC Election : मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळावर लढावं: भाई जगताप