मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मला अहंकारी संबोधलं गेलं. माझ्या महाराष्ट्रासाठी आहे मी अहंकारी! का नसावं? जे जनतेच्या हितासाठी, ते करण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. दरम्यान, इगो सोडा, आरेमध्ये काम सुरू करा, आम्ही टीका करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं होतं.


कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कांजूर कारशेडच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, "सध्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन थयथयाट सुरु आहे. मला अहंकारी म्हटलं गेलं. जरुर माझ्या मुंबईसाठी मी अहंकारी आहे. माझ्या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी आहे. का नसावं मी अहंकारी, कारण आरे कारशेड मेट्रो 3च्या लाईनसाठी करण्यात येणार होतं." पुढे ते म्हणाले की, " त्या ठिकाणी 30 हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी 5 हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं. उरलेली 25 हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर जागा कमी पडते म्हणून जंगल मारत मारत ही जागा वापरावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता."


कारशेडच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही वाढवली. कांजूरमार्गला 40 हेक्टर जागा मिळली होती. कांजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या 3, 4 आणि 6 या मार्गिकेचे कारशेड करता येणार होते. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होतं तिथे इतर लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?"


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. पण जर हे कारशेड कांजूरमध्ये केलं तर त्याचा वापर पुढच्या 40 वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे."


कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक : मुख्यमंत्री 


कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं.


महत्त्वाच्या बातम्या :