मुंबई : केंद्रातलं सरकार गमावल्यानंतर राज्यातूनही काँग्रेसच्या हातून सत्ता निघून गेली. विरोधकांच्या बाकावर बसणाऱ्या काँग्रेसला काही देणी चुकवायची आहेत. आझाद मैदानातील काँग्रेस कार्यालयाशेजारील चहावाल्याचं तब्बल दोन लाखांचं कर्ज पक्षावर आहे. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीच्या आझाद मैदानावरील मुख्यालयाशेजारी चहावाल्याचं दुकान आहे. इंदर जोशी हे चहाचं दुकान चालवतात. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपासून नेते मंडळींपर्यंत सर्वांचंच प्राधान्य या चहावाल्याला असतं. मात्र क्रेडिट बेसिसवर चालणाऱ्या आपल्या दुकानाचे दोन लाख रुपये काँग्रेसकडे थकले असल्याचा दावा, त्याने केला आहे.

'गेल्या दहा वर्षांपासून माझं कुटुंब चहाचं दुकान चालवतं. गेल्या काही काळापासून त्यांनी आमचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही उधारीवर चहा देणं बंद केला आहे.' असं जोशींनी सांगितल्याचं 'मिरर'च्या वृत्तात म्हटलं आहे. जोशी यांचं कुटुंब गुजरातमधून मुंबईत स्थलांतरित झालं असून गुजराती पदार्थांसाठीही ते प्रसिद्ध आहेत.

'काही आठवड्यांपूर्वी चहावाल्याचे पैसे थकल्याचं माझ्या ऐकिवात आलं. आमच्या एका पदाधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला. एकूण चार लाख रुपये चुकते करायचे होते, त्यापैकी अर्धी रक्कम आम्ही भरली आहे, तर दोन लाख रुपये बाकी आहेत' असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे.