102 वर्षांचे सेवानिवृत्त तहसीलदार रामचंद्र गिंडे यांच्यावर 18 ऑक्टोबर रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये हर्नियावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर आपण भविष्यात चालू-फिरु शकतो का, याची देखील शाश्वती गिंडे व त्यांच्या कुटुंबियांना नव्हती. हर्नियासारखी जटील शस्त्रक्रिया करण्यास अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी नकार दिला होता. 102 वय असल्याने त्यांच्यावर या वयात शस्त्रक्रिया केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते.
एकीकडे शस्त्रक्रिया करण्यास मिळणारा नकार, तर दुसरीकडे दुखणे वाढत चालल्याने चिंता वाढत होती. 90 व्या वर्षी त्यांना हर्निया झाल्याचे निदान करण्यात आले होते. इरेड्यूसिबल ग्रोइंग हर्निया मुळे उलट्या व इतर दुखणे त्यांना असह्य करत होते. रोजचे खाणे व फिरणे याच्यावर अधिक परिणाम होऊ लागल्याने. त्यांची प्रकृती खालावू लागली. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
अपोलोमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यानंतर डॉ. शालीन दुबे यांनी इरेड्यूसिबल ग्रोइंग हर्निया असल्याचे निदान केले. त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. डॉ. शालीन दुबे यांनी मोठे आव्हान स्वीकारत वयाच्या 102 व्या वर्षी रामचंद्र गिंडे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. हर्नियाची शाश्त्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची असल्याने त्यांनी 15 सेमी आकाराच्या हर्नियावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे 102 वय असूनही रामचंद्र गिंडेंची प्रकृती ठणठणीत आहे.