मुंबई : मुंबई महापालिकेचं घोडामैदान जवळ येत असताना आजवर रखडलेल्या प्रकल्पांना आता मंजुरी देण्याचा धडाका सुरु झाला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत एकाच दिवशी तब्बल 74 प्रकल्पांना हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी मिळण्याची शक्यता असलेल्या या 74 प्रकल्पांची अंदाजे किंमत ही 1 हजार 118 कोटींच्या घरात आहे. लवकरच येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे. त्याआधीच सर्व नगरसेवकांनी प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यात शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि प्रतिष्ठेचीही आहे. सत्ता टिकवणं हे शिवसेनेसमोर आव्हान असेल. त्यात भाजप स्वबळावर लढणार की सेनेसोबतच जाणार, हेही अद्याप निश्चित नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे.