राणेंना टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची युती?
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2017 09:09 AM (IST)
राणेंविरोधात एकच उमेदवार देऊन त्याला इतर पक्षांनी पाठिंबा देण्याची रणनीती सुरु असल्याची चर्चा आहे.
मुंबई : नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत नारायण राणेंचा विजय सहजसोपा नसल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा वारु रोखण्यासाठी काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाऊन बाहेर पडल्यानंतर राणे भाजपच्या उंबरठ्यावरुन मागे फिरले. त्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यावर ते एनडीएमध्ये सहभागी झाले. यानंतर राणे यांची भाजप मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चाही सुरु झाली. राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सात तारखेलाच निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.