मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. पीटर आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनी कट आखून शीनाची हत्या केल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात इंद्राणीनं पत्र पाठवून माहिती दिली.


आपण निर्दोष असल्याचा दावाही इंद्राणीने या पत्रातून केला आहे. इद्राणीने पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत.

पीटर मुखर्जीने ड्रायव्हर आणि अन्य लोकांच्या मदतीने 2012 मध्ये शीनाचे अपहरण केले असावे. ती बेपत्ता होण्यामागे आणि नंतर पुरावे नष्ट करण्यामागे या लोकांचा हात असू शकतो, असे इंद्राणीने या पत्रात म्हटलं आहे. शिवाय, पीटर मुखर्जीच्या 2012 आणि 2015 सालचा तपशील तपासावा, असं इंद्राणीनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती.  गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता.

हत्येप्रकरणी आधी शीना आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती.