मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकाहाती सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न जरी भंगलं असेल तरीही भाजपने इथे जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 104 जागांवर विजय मिळवण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. भाजपच्या या यशानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

'कर्नाटकात जिंकलो, मतदारांचे आभार... आता भंडारा जिंकू 'ठोकून' आणि पालघर जिंकू 'ठासून'...' असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे.


पालघरमध्ये शिवसेनेनं लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने भाजपने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली होती. मात्र, तरीही शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

कर्नाटकच्या निर्णयानंतर आशिष शेलार यांनी अशाप्रकारे ट्वीट करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता शिवसेना त्यांना कशा पद्धतीने उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणूक निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपलाही आव्हान दिलं आहे. 'भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय, तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.