मुंबई : शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील आपला पराभव आता तरी मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे, असा इशाराही जिशान सिद्धकी यांनी दिला आहे.


जनतेने मला कौल दिला आहे. मला माझ्या मतदारसंघात कामे करू द्यात. जाणीवपूर्वक मला विविध ठिकाणी टाळण्याचा अनिल परब यांनी जो प्रयत्न सुरू ठेवला आहे. हे त्यांना शोभणारे नाही. ते वरिष्ठ मंत्री आहेत. माझ्या मतदार संघात मी करत असलेली छोटी छोटी कामे देखील केवळ वर्षभर एनओसी न मिळाल्यामुळे पडून आहेत. मी आत्तापर्यत याबाबत माझे सर्व वरिष्ठ नेते यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या कानावर या सर्व बाबी घातल्या आहेत. आता हा सर्व विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालणार आहे. माझ्या मतदारसंघात मी केवळ यांच्यामुळे कामे करू शकत नसेल तर मला याविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. आणि त्याची सुरुवात आता झाली आहे.अशा पद्धतीची भावना वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार जिशान सिद्धकी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. 


आमदार जिशान सिद्धकी यांनी ट्विटर वर अनिल परब यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला असता जिशान सिद्धकी म्हणाले की, मंत्री अनिल परब जाणून बुजून अशा बाबी करत आहेत. मागील दीड वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय. मी माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोललोय. आता मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलावं लागणार आहे. अनिल परब यांना असं वागणं शोभत नाही. तरुणांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. ते वरिष्ठ आहेत. आम्ही एकत्र आहोत आणि ते असं वागत असतील तर हे शोभणारे नाही. असे प्रकार वारंवार समोर येत आहे. मी एखादं छोटं काम जरी करत असेल तरी त्याची एनओसी मला वर्ष-वर्ष मिळत नाही. 


महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. परंतु, अनिल परब सारखे काही नेते आहेत जे जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहेत. यासाठी मला आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलावं लागलं आहे. आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी या प्रकरणात थोड्याफार प्रमाणात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परब यांनी लक्ष्यात घ्यायला हवं की मला लोकांनी बहुमत दिलं आहे. त्यांनी त्यांची हार आता तरी मान्य करायला हवी. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे. 


माझ्या मतदारसंघातील अनेक वॉर्ड मधील कामे होत नाहीत. त्याठिकाणी असणारे अधिकारी आणि नेते सांगतात आमच्यावर अनिल परब यांचा दबाव आहे. अनिल परब यांनी मी जर काम करतोय तर त्यामध्ये अडचण निर्माण करण्याचा तरी प्रयत्न करू नये. महाविकास आघाडी हा एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन काम करत आहे. यामध्ये हा एक मंत्री अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत पत्र व्यवहार केला आहे.