मुंबई: 'जोपर्यंत राज्य सरकारमध्ये शिवसेना भाजपशी ब्रेकअप करत नाही तोपर्यंत, शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार नाही.' अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मुंबईतील काँग्रेसच्या चिंतन बैठकीनंतर ते बोलत होते.


भाजप आणि शिवसेना आता काय भूमिका घेणार याकडे सध्या काँग्रेसचं लक्ष आहे. त्यानंतरच काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार आहे. मात्र, महापौर निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिल्यास शिवसेनेला त्याचा फायदा होऊ शकतो. असं मत जाणकार व्यक्त करत आहे. त्यामुळे काँग्रेस आता नेमकी काय भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.

दुसरीकडे, याबाबत बोलताना काँग्रेस नेते नारायण राणे म्हणाले की, 'शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा आमच्यात सध्या तरी झालेली नाही. पण पाठींबा द्यावा की नाही याबाबत हायकमांड निर्णय घेईल.'

दरम्यान, मुंबई महापालिकेत कुणाही एका पक्षाला सत्ता मिळाली नसल्यामुळे सत्तेचं त्रांगडं झालं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबईत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल आज भाजपच्या कोअर कमेटीची बैठक होणार आहे. त्यानंतर युतीचा निर्णय घेतला जाईल.

तर आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक होईल. या बैठकीला रावसाहेब दानवे,  सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. मुंबईत शिवसेनेसोबत युती करायची की महापौरपदावर दावा कायम ठेवायचा याविषयी बैठकीत रणनिती ठरणार आहे. तर शिवसेनेच्या वतीनं उद्या दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात बैठक होणार आहे.

मुंबई महापौरपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. या दोन्ही पक्षांच्या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. या सर्वात यंदा काँग्रेसची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

युती होणार का? आशिष शेलार म्हणतात...

राज ठाकरेंच्या 'सात'ची 'साथ' शिवसेनेला की भाजपला?

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण