मुंबई : गुरुवारी संध्याकाळी कल्याणमध्ये काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसने संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या एका सभेचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु सहा वाजता होणाऱ्या सभेला चव्हाण रात्री साडेनऊ वाजता आले. तोवर सभेसाठी आलेले लोक घरी परतले होते. तसेच काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील कंटाळून घरी गले होते.
दरम्यान सभेची तयारी करत असताना सभेच्या काही वेळ अगोदर मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि प्रदेश सचिव प्रकाश मुथा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत राडेबाज कार्यकर्त्यांना सभास्थळाहून हटवले आणि मोठा राडा टळला.
अखेर साडेनऊ वाजता अशोक चव्हाण सभास्थळी पोहोचले. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. या सभेवेळी मनसेचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान पदाधिकारी रमेश रतन पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक भूकंप होणार आहेत.
प्रियांका गांधींच्या राजकारणात येण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे म्हणणाऱ्या रामदास आठवले यांचाही काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला. आठवले यांनी आमची काळजी करू नये, त्यांनी सध्या स्वतःची काळजी करण्याची आवश्यकता आहे, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
अशोक चव्हाणांची लेटलतिफी, बॅनरबाजीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपसात राडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 07:02 AM (IST)
सहा वाजता होणाऱ्या सभेला चव्हाण रात्री साडेनऊ वाजता आले. तोवर सभेसाठी आलेले लोक घरी परतले होते. सभेअगोदर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपसांत जोरदार भांडणही झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -