काँग्रेस नगरसेवकाला चार लाखांच्या खंडणीप्रकरणी अटक
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2019 06:42 AM (IST)
काँग्रेसचे सभागृह नेते व नगरसेवक मतलूब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते व नगरसेवक मतलूब अफजल सरदार यांना चार लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने भिवंडी शहरात खळबळ माजली आहे. शांतीनगरमधल्या पिरानीपाडा मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून मतलूब अफजल सरदार हे नगरसेवक आहेत. त्यांनी पिराणीपाडा येथील नुरी अपार्टमेंट या अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफिज अन्सारी यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर सलीमने चार लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी काही पैसे नगरसेवक मतलूब यांनी दोन टप्प्यात स्वीकारले होते. परंतु उरलेल्या पैशांसाठी मतलूब यांनी सलीम यांच्याकडे तगादा लावला होता. पैसे न दिल्यास इमारतीला निष्कासित करण्याची धमकी देऊन मतलुब सरदारने बिल्डर सलीम यांच्याकडे खंडणीचा तगादा लावला. कंटाळलेल्या बिल्डरने खंडणीप्रकरणी मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर करीत शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी मतलुब अफजलविरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी कलम 384 आणि कलम 385 अंतर्गत गुन्हा दाखल करुन रात्री उशीरा अटक केली. या बातमीनंतर शहरातील लोकप्रतिनिधी व काँग्रेस गटात खळबळ उडाली आहे.