Congress Protest : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. केंद्रातील भाजप सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत असून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.  भाजपा सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा विरोध करण्यासाठी 13 जूनला मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री सहभागी होणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हे लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून काम करत आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना मोदी सरकारने कळसुत्री बाहुल्या बनवले आहे. विरोधकांना नामोहरण करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या घरावर धाडी टाकल्या जात आहेत, त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

काँग्रेस पक्ष सातत्याने भाजपाच्या जुलमी, अत्याचारी व मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवत आला आहे. तीन काळे कृषी कायदे, महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर भाजपा सरकारला काँग्रेसने रस्त्यावर उतरूनही जाब विचारला आहे. नुकतेच उदयपूर येथे काँग्रेस पक्षाचे नवसंकल्प शिबीर पार पडले या शिबिरातील काँग्रेस पक्षाचा उत्साह पाहून भाजपाला धडकी भरली असून आमच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी खोटे प्रकरण रचून ईडीची नोटीस पाठवण्यात आली असल्याचे पटोले यांनी म्हटले.  भाजपा सरकारच्या या कटकारस्थानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार १३ जून रोजी ईडीच्या कार्यासमोर धरणे आंदोलन करणार असून आम्ही मोदी सरकारच्या दडपशाहीला भिक घालणार नाही असे पटोले म्हणाले. 

मुंबई ईडी कार्यालयासमोर आंदोलन    

मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, खा. रजनीताई पाटील, खा. कुमार केतकर,  प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नसीम खान, प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

 नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन

तर नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, आमदार कुणाल पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहे.