मुंबई : मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा पेच वाढला आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा पेच सोडवण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार विधी व न्याय विभागाने अभिप्राय देण्यास नकार दिला आहे.


महापालिकेत सत्ता स्थापन होऊन कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधी पक्षनेतेपद रिकामंच आहे.

मुंबई महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या भाजपने विरोधी पक्षनेतेपद घेण्यास नकार दिला आहे. तर काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे.

विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात येईल असं महापौरांनी म्हटलं आहे. मात्र, आता विधी व न्याय विभागाने अभिप्राय देण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षनेतेपदाबाबत पेच आणखीच वाढला आहे.

दरम्यान, विधी व न्याय विभागाच्या अभिप्राय न देण्यामागे भाजपचा छुपा दबाव असल्याची जोरदार चर्चा आहे.