मुंबई: डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर अज्ञांनी हल्ला केला. सूर्यवंशी यांना तीन ते चार जणांनी हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सूर्यवंशी यांच्यावर खारघरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खारघरच्या शिल्प चौकात हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला, का केला हे अद्याप अस्पष्ट आहे.

सुधीर सूर्यवंशी हे कारचे टायर पंक्चर झाले म्हणून पंक्चरवाला शोधत होते. त्यावेळी तीन-चार अज्ञात लोक आले आणि त्यांनी सूर्यवंशी यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

मारहाणप्रकरण  विधानपरिषदेत 

दरम्यान, सुधीर सूर्यवंशी मारहाण प्रकरणाचा मुद्दा विधानपरिषदेतही उपस्थित करण्यात आला.  काँग्रेसचे पुण्यातील आमदार अनंत गाडगीळ  यांनी विशेष उल्लेख करुन मारहाणीचं प्रकरण गंभीर असून, सरकारने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी केली.

त्यावर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी 'या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल', असं आश्वासन दिलं.