मुंबई : गेल्या दोन महिन्यांच्या सत्तानाट्य आणि वाटाघाटीनंतर आज अखेर सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं आणि ओस पडलेल्या मंत्रालयात पुन्हा एकदा सर्वसामान्यांची वर्दळ वाढली. आज मंत्र्यांनी आपल्या कार्यालयात येऊन चार्ज घेण्यास सुरुवात केली. त्यात पहिला नंबर लावला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. सकाळी 9.30 वाजता अजित पवार कार्यालयात दाखल झाले. तेव्हापासून अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री ही नेमप्लेट शोधत लोकं अजित पवारांच्या कार्यालयाबाहेर थेट रांग लावून उभे आहेत. ओली रखडलेली कामं किमान या नव्या महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल, या आशेने लोकांनी दालना बाहेर एकच गर्दी करायला सुरुवात केली आहे.


तसेच या रांगेत एक 74 वर्षांच्या सुंदराबाई पैठणे या आजीबाई आम्हाला भेटल्या. हातातली काठी टेकवत त्या औरंगाबादहून मंत्रालयात पोहोचल्या. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या घरकुलाच्या कामासाठी त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या खेटा घालत आहेत. मात्र आज त्यांनी सरकार कार्यरत होताच थेट उपमुख्यमंत्र्यांचं दालन मोठ्या अपेक्षेने गाठलं. रांगेत उभ्या असलेल्या आजींची दखल घेत अजित पवारांची भेट घ्यायला आलेल्या जितेंद्र आव्हाडांनी त्यांना संबंधित अधिकाऱ्याला कामात लक्ष घालायला लावले.

अशा पद्धतीने अजित पवारांनी तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर कामाचा धडाका लावायला सुरुवात केली आहे. सर्वांची भेट घेऊन 'ऑन द स्पॉट निकाल' या त्यांच्या नेहमीच्या शैलीत ते पुन्हा कार्यरत झाले आहेत. त्यामुळे अजित पवार पुन्हा फॉर्मात आले आहेत अशी जोरदार चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.

आता खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेलं तीन पक्षांचं महाविकासआघाडी सरकार अंतर्गत कुरबुरी संपवून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या मागे लागेल अशी प्रतीक्षा या सामान्य जनतेला आहे. "गरिबांची कामं केली तर सरकार, नाही तर त्या सरकारचा काय उपयोग" अशी रांगेत उभ्या असलेल्या आजीबाईंनी व्यक्त केलेल्या भावनेचा आदर हे सरकार करेल, अशी आशा आहे. अन्यथा या निवडणुकीत जनतेचा कौल काय करु शकतो हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलेच आहे याचा विसर पडणार नाही म्हणजे झालं.