मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधिशांची चौकशी समिती स्थापन करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी. राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे. 


महाविकास आघाडी सरकारमधील सूत्रांनी असेही सूचित केले आहे की, सध्यातरी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या पदावरून हटणार नाहीत. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्यावेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


एनआयएला सापडलेली सचिन वाझेंची डायरी 100 कोटींची गुपितं उघडणार?


अनिल देशमुख प्रकरणात शिवसेना लुडबुड करणार नाही


परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे  महाराष्ट्र सरकारला बॅकफुटवर जावे लागले असताना आता शिवसेनेने देखील या प्रकरणात सावध पवित्रा घेतला आहे. अनिल देशमुख प्रकरणात शिवसेना हस्तक्षेप करणार नाही अशी माहिती मिळत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजीनामा होणार की नाही याबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाहीत. देशमुखांचे काय करायचे याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती मिळत आहे.