मुंबई : पोलीस विभागातील वाहनांना आता फिरता अंबर रंगाचा दिवा असेल, तर मुंबई महापौरांना स्थिर लाल दिवा असेल. याशिवाय दिवा वापरण्यासाठी काही नवीन पदांचा समावेश करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.


मुंबई शहराच्या महापौरांना राजशिष्टाचाराप्रमाणे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यानंतरचा दर्जा असतो. त्यामुळे मुंबई शहराच्या महापौरांना असलेला विशिष्ट दर्जा विचारात घेऊन या पदास स्थिर लाल दिवा राहील.

आतापर्यंत पोलीस, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, पायलट कार यांना स्थिर निळा दिवा किंवा लाल-निळा-पांढरा असा दिवा होता. पण तो नजरेस पडत नसल्यानं त्यांना आता फिरता म्हणजेच फ्लॅशसह लाल-निळा-पांढरा दिवा असेल.

अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ आणि ब वर्ग महापालिकांचे महापौर, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांना स्थिर अंबर दिवा देण्यात आला होता. आता त्याऐवजी या पदांना फिरता अंबर दिवा वापरता येईल.

याशिवाय प्रधान सचिव किंवा सचिव पदावर नियुक्त होण्यास पात्र समकक्ष अधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, उच्च न्यायलयाचे न्यायाधीश यांना समकक्ष असलेले न्यायाधिकरणातील अध्यक्ष आणि सदस्य तसंच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी या नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे.