वसई: वसईच्या मर्सेस येथील वेस्ट पामबिच रिसॉर्टमध्ये एका कॉलेज युवकाचा स्विमिंग पूलमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमर धरम सिंग असं या २० वर्षीय कॉलेज युवकाचं नाव आहे.


मुंबईच्या सायन येथील राजश्री शाहू महाराज कॉलेजमधील आठ युवकांचा ग्रुप आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेस्ट पामबिच रिसॉर्टमध्ये बुधवारी आला होता. स्विमिंगपूलमध्ये हा ग्रुप खेळत असताना अचानक अमर हा स्विमिंगपूल मध्ये बुडाला. अमरच्या बुडण्यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र या रिसॉर्टमध्ये बार आहे आणि या सर्व कॉलेजच्या मुलांनी मद्यप्राशन केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

दुसरीकडे स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्डही नेमले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वसई पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र स्थानिक रिसॉर्ट मालकाविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.