ठाणे: ठाण्याच्या उपवन परिसरात अनैतिक व्यवसायाचा अड्डा महापालिकेनं उध्वस्त केला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना येऊर रस्त्यानजीक पालिकेला एक लॉज आढळून आलं. त्याची भिंत पाडल्यानंतर आत अनैतिक धंद्यांची गुहाच सापडली.
सत्यम नावाच्या या लॉजच्या खाली 3 मजले बांधण्यात आले होते. ज्यात जवळपास 290 खोल्या होत्या. या खोल्या 10 बाय 20 आकाराच्या असून आत एक बेड आणि पंखा इतकंच साहित्य होतं.
महापालिकेला कारवाई करताना इथं दारुच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळून आलं आहे. पण पालिका, वनविभाग आणि पोलीस यांच्या अखत्यारीतल्या या भागात इतकं मोठं बांधकाम झालं तरी कुणाला कसं कळालं नाही? इथं चालणाऱ्या धंद्यांबद्दल पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल ठाणेकरांकडून विचारला जातो आहे.
दरम्यान, याविषयी 'एबीपी माझा'शी बोलताना ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याप्रकरणी संपूर्ण माहिती दिली.़
'ठाणे शहरातील अनधिकृत लॉजिंग बोर्ड आणि लेडीज बार तोडण्यास पालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे. यावेळी सत्यम लॉजची तोडफोड करण्याताना धक्कादायक गोष्ट समोर आली. कारण की, तिथे अनैतिक व्यवसाय सुरु होते. त्यासाठी तळमजल्याच्या खाली तब्बल 3 मजल्यांची इमारत उभारण्यात आली होती. मात्र, याबाबत कुणी तक्रार केली होती की नाही? याबाबत मला अजून माहिती मिळालेली नाही. कारण की, सत्यम लॉजचा दर्शनी भाग पाहता त्याच्या खाली असं काही असू शकतं? याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही.' असं आयुक्त म्हणाले.