Coastal Road Project : मुंबईतील (Mumbai) कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील खांबांमधील अंतरावरुन महापालिका (BMC) आणि वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. मच्छिमार बोटींचे अपघात टाळण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी इथल्या समुद्रामधील 7 ते 9 या तीन खांबांमधील क्रमांक 8 हा खांब रद्द करुन दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


बीएमसी आणि मच्छिमारांमध्ये अनेकदा संघर्ष


मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड  प्रकल्पात वरळी इथल्या समुद्रात दोन खांबांमधील अंतर 60 मीटर ठेवण्यात आलं  होतं. वरळी-कोळीवाडा इथल्या क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छिमारांच्‍या शेकडो बोटी दररोज मासेमारीसाठी समुद्रात जातात. खांबांमधील कमी अंतरामुळे या बोटींचे अपघात होण्याची भीती व्यक्त करत मच्छिमारांनी हे अंतर 200 मीटर ठेवण्याची मागणी केली होती. परंतु महापालिकेने ती अमान्य केल्याने गेल्या दोन वर्षांपासून बीएमसी आणि मच्छिमारांमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता. यामुळे सागरी किनारा मार्गाचे काम काही महिने बंद पाडण्यात आलं होतं.


याच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांनी दोन खांबांमधील अंतर 160 मीटर करण्याची शिफारस महापालिकेला केली होती. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या चर्चा, बैठकांनंतर अखेर हे अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून पत्राद्वारे मच्छिमार संघटनांना कळवण्यात आले आहे.


11 पैकी 5 खांबांचं बांधकाम पूर्ण


कोस्टल रोड प्रकल्पात एकूण 11 खांबांचे बांधकाम होणार असून 5 खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 7 पासून पुढे होणाऱ्या खांबांच्या कामांमध्ये क्रमांक आठ हा खांब कमी करुन 7 ते 9 या दोन खांबांमधील अंतर 120 मीटर असेल.


कोस्टल रोड प्रकल्पाविषयी


- मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
- एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. 
- प्रकल्पामध्ये 4+4 मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.
- किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, 2018 मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. 
- एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. 
- त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरितपट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.
- एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.