मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराचा आधार घेत काढलेला निष्कर्ष पूर्णत: चुकीचा असल्याचा दावा सीएमओने केला आहे.


हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी लागणारे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठी होणारा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे. यात वर्षनिहाय देयक दिल्याचा आकडा असून ते एकाच वर्षाचे दिले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही, असंही सीएमओकडून सांगण्यात आलं.

मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा, निरुपम यांचा आरोप


मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येत अलिकडे प्रचंड वाढ झाली आहे. या अभ्यागतांमध्ये सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देश-विदेशातील शिष्टमंडळे, विविध उद्योगसमुहांची प्रतिनिधी मंडळे, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या भेटींचा समावेश आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे आयोजित विभागवार बैठकांची देयकं संबंधित विभाग देत असत. आता या बैठकांची देयकं मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जात आहेत. तसंच शासकीय विभागांच्या बैठकांची संख्याही वाढली आहे. त्याचप्रमाणे अतिथ्यखर्चात पुरवण्यात येणाऱ्या जिन्नसांच्या दरातही वाढ झाली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणारे विविध मान्यवर, वेळोवेळी भेटणारी शिष्टमंडळे, सर्व अभ्यागत, देश-विदेशातील मान्यवर तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांच्या भेटीदरम्यान करण्यात आलेले चहापान आणि अल्पोपहार याचा खर्चात समावेश असतो. तसेच बरेचदा या सर्व जिन्नसांचा पुरवठा केल्यावर त्यांची देयके तात्काळ सादर केली जात नाहीत. उशीरा सादर झालेली देयके पुढील आर्थिक वर्षांत येतात आणि ती देयके एकत्रितपणे अदा केल्यामुळेदेखील अशा खर्चात वाढ आहे, असा दावा सीएमओकडून करण्यात आला.

काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री कार्यालयात 2015-2016, 2016-2017 आणि 2017-2018 मध्ये चहा आणि अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाल्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी लक्ष वेधलं.

माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 2015-2016 साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर 57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च झाला होता. तो खर्च 2016-2017 मध्ये एक कोटी 20 लाख 92 हजार 972 रुपयांवर पोहचला.

त्यानंतर 2017-2018 वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.
संबंधित बातम्या :

उंदीर घोटाळ्यावरुन विखे पाटलांची चौफेर टोलेबाजी

मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र

उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही?

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप