मुख्यमंत्र्यांचा धोबीघाट, क्लीन चिट देण्याचा सपाटा
एबीपी माझा वेब टीम | 28 Mar 2018 07:59 PM (IST)
मुख्यमंत्र्यांनी आमदार संभाजी निलंगेकर आणि तोरणमाल रिसॉर्ट प्रकरणी पर्यटन मंत्री जयकुमार रावल या दोघांनाही क्लीन चिट दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबीघाट सुरु केला आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण प्रत्येकावरचे डाग धुवून काढण्याचा सपाटाच जणू मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना क्लीन चिट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवास्तव कर्जमाफीप्रकरणी आमदार संभाजी निलंगेकर आणि तोरणमाल रिसॉर्ट प्रकरणी पर्यटन मंत्री जयकुमार रावल या दोघांनाही क्लीन चिट दिली आहे. कर्जमाफी प्रकरणात संभाजी पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण करण्यात आली. 'निलंगेकरांनी स्वतः कर्ज घेतलं नसून ते जामीनदार होते. आरबीआयच्या नियमानुसार ओटीएस पद्धतीने सेटलमेंट झालं. युवा मंत्र्याला बदनाम न करण्याचं माध्यमांना आवाहन आहे.' असं मुख्यमंत्री म्हणाले.