मुंबई : उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं, असं मत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्ये आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्ताने 'सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा,' अशा मथळ्यासह आज सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला होता. आता उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचं नेतृत्त्व करण्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं.


दरम्यान देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.


महाविकास आघाडीत उत्तम समन्वय
शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये कुरबुर असल्याची चर्चा रंगू लागली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आलेले आहेत, यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे ती मंत्रालय कामकाजासाठी आहे. तिन्ही पक्षांना समन्वय समितीची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु गरज पडल्यास पुन्हा विचार करु."


सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा : 'सामना'च्या अग्रलेखातून मागणी


केंद्राने निधी गोठवल्यामुळे आमदार-खासदारांची नाराजी
मागील काही दिवसात निधी वाटपावरुन काँग्रेस आमदार नाराज असल्याचं समोर आलं होतं. याबाबत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरच निशाणा साधला. "तीन पक्षाचं सरकार असताना निधी वाटपास आमदार आणि खासदारांची नाराजी आहे. पण केंद्राने निधी गोठवल्यामुळे अडचण आहे," असं संजय राऊत म्हणाले.


निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप करत जालन्याचे 11 आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि निधी वाटपात दुजाभाव केला जाणार नाही असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे उपोषण रद्द करण्यात आलं.


राहुल गांधी सक्षम आहेत : संजय राऊत
23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरुन दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठक वादळी ठरली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेसमध्ये जे काय घडलं त्यावर काँग्रेसनेच बोललं पाहिजे. काँग्रेस मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस पक्षाने या वादळातून सावरावं आणि जमिनीवर काम करावं. "तसंच संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत," असंही संजय राऊत म्हणाले.